आजकाल आम्ही मित्र
खूप “हेल्थ कॉन्सिअस” झालोय. अविनाश पक्का राजकारणी पण आता तो राजकारणापेक्षा
आरोग्यावर बोलणेच जास्त पसंद करतो.असच एके दिवशी त्याने बोलता बोलता ट्रेक करूया
अस सुचवलं आणि माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी लगेच त्याला होकार दिला. ट्रेकला येण्यासाठी
सचिन व दीपक ने देखील समती दर्शविली आणि ट्रेक साठी आम्ही ठिकाण शोधू लागलो. आम्ही
चौघांमध्ये मलाच काय तो थोडा-बहोत अनुभव होता त्यामुळे आम्ही लोहगड
किल्ला निश्चित केला. हा किल्ला गिरीदुर्ग
प्रकारातील आहे. लोणावळा डोंगर रांगेतील
हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
३ एप्रिल ला सकाळी
६:०० वाजता आम्ही लोणावळा सोडून लोहगडवाडी
येथे जाण्यासाठी निघालो. लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने
थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे
गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ
आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. येथे जाण्यासाठी एसटी
महामंडळाची सोय नाही. लोहगडवाडीला नाश्ता व जेवणाची सोय होते. लोहगडवाडीला पोहोचल्या नंतर
आम्ही किल्ले लोह्गड चढायला सुरुवात केली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार
मार्गावरून जावे लागते.
गणेश दरवाजा : ह्याच्याच
डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या
बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस
शिलालेख आहेत.
नारायण दरवाजा : हा
दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी
साठवून ठेवण्यात येई.
हनुमान दरवाजा : हा
सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
महादरवाजा : हा
गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम
नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.
महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो.
दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर
बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ
काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या
अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी
कोठी आढळते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे.
३० ते ४० जण आरामात राहू शकतात. आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये
जेवणाची सोय होते. बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे
एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे
अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील
पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास
एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी
आहे.
मोठ्या तळ्याच्या
पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या
पश्चिमेस विंचूकाटा आहे.पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड
आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले
असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस
विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर
न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.
दोन दिवसांच्या भ्रमंतीनंतर घरी परतत असताना एक समाधान सर्वांच्या चेहेऱ्यावर दिसत होत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून काहीतरी वेगळे केल्याचे भाव दिसत होते. हाच आनंद सर्वाना देता यावा म्हणून आम्ही "VAJRA ADVENTURE CLUB " ची स्थापना केलेय. आज आम्ही चौघे मित्र मी,अविनाश,दिपक (आबा) आणि सचीन हेच संस्थापक सदस्य आहेत पण आम्हाला आशा आहे कि काही दिवसातच आमच्यासारखे वेडे VAC चे सदस्य होतील....
मित्रानो परत भेटू आमच्या पुढच्या भटकंतीनंतर,,,, तोपर्यंत जय महाराष्ट्र .......
धन्यवाद ....

 |
| भक्कम दरवाजे आणि तटबंदी |
 |
| विंचू काटा |
 |
| किल्यातील तोफा |
 |
| शिलालेख... |
 |
| क्षणभर विश्रांती |
 |
| मार्ग कठीण आहे अवि... |
 |
| सचिन आणि अविनाश : दबंग स्टाईल |
 |
| भाजे लेणी |
 |
| स्तूप |
 |
| सर्पाकृती मार्ग |