Monday, 31 July 2017

अचानक टकमक


ढगांमध्ये लपलेला "टकमक"

दिपक, रुपेश आणि मी , फोटो काढणारा अर्थात अविनाश 
ठरल्या प्रमाणे दिपकचा फोन सुरु झाला, पुन्हा एक रविवार येणार होता. कामाच्या गडबडीत काही सुचत नव्हत आणि अगदी वेळेवर जवळचाच “टकमक किल्ला” करायचं ठरलं. वेळेवर सर्व ठरल्यामुळे जास्त मित्रांना सांगू शकलो नाही. रविवारी सकाळी ६:३० ला आम्ही बाईक ने सकवार ह्या किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाकडे निघालो. सकवार ते वज्रेश्वरी हे २६ किमीचं अंतर आहे . शिरसाड फाट्यापासून सुरत कडे जाताना साधारण ११ किमी वर उजव्या बाजूला सकवार हे गाव आहे. गावात गौशालेजवळ बाईक पार्क करून आम्ही किल्याच्या दिशेने निघालो. सोबत वाटाड्या होताच. मित्रानो, किल्ला आणि त्याचा परिसर यांची जर निट माहिती नसेल तर जाणकार वाटाड्या सोबत घ्यायला विसरू नका.

विश्रांतीचा एक क्षण 
पुन्हा पायपीट 
माझी ट्रेकमेट 
 गावापासून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वीस मिनिटांची पायपीट करावी लागते आणि मग चढाई सुरु होते. किल्ला मध्यम श्रेणीमध्ये मोडतो आणि उंची अंदाजे २००० फुट आहे. १२व्या शतकात बांधलेल्या ह्या किल्ल्याचा वापर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्या नंतर १६व्या शतकात हा किल्ला पोर्तुगीझांकडे गेला. त्याकाळी सुस्थितीत आणि राबता असलेल्या ह्या किल्ल्यावर आजमितीला पाण्याची टाक, दोन तोफा एक शिव मंदिर आणि तटबंदी ह्या व्यतिरिक्त काही नाही.  परंतु जर संशोधन केले गेले तर खूप काही मिळू शकेल.
रुपेश, दिपक आणि अविनाश 

सेल्फी वाला मोमेंट 
किल्ल्याकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलामधून जातो. काही ठिकाणी खडी चढाई आहे. घनदाट जंगल, सतत पडणारा पाऊस आणि धुक यामुळे वातावरणात कमालीची शांतता जाणवत होती. किल्ला तर ढगांमध्ये हरवला होता. एक तासाच्या पायपिटीनंतर आम्ही माचीवर पोहोचलो आणि अचानक सर्व वातावरण निवळल. समोर तानसा आणि वैतरणा ह्या नद्यांची विस्तीर्ण पात्र दिसत होती. बाजूला टकमकचा सुळका आणि मागे घनदाट जंगलामधून डोकावणारी पर्वतरांग. थोडीशी विश्रांती आणि पोटपूजा झाली. पुन्हा पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरु झाला आणि एका क्षणात किल्ला अदृश्य झाला.

सुपरमॅन रुपेश 
किल्ल्यावर पोहोचेपर्यंत जोरदार पाउस सुरु झाला होता त्यामुळे विशेष काही बघता आल नाही. थोडा वेळ किल्ल्यावर घालवल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. जवळचाच, अतिशय सुंदर आणि जैव-विविधतेने समृद्ध असा एक किल्ला आज पदक्रांत झाला होता. आळसावलेल्या रविवार मन प्रसन्न करून गेला.



पिण्याच्या पाण्याची टाकं 

तोफा

तटबंदी - फक्त हीच सुस्थितीत आहे.


कसे पोहोचाल ?
  • विरार (पूर्वे) पासून मुंबई-अहमदाबाद हायवे वर शिरसाड फाट्यापासून सुरत कडे जाताना साधारण ११ किमी वर उजव्या बाजूला सकवार हे गाव आहे.
  • सकवार गावात गौशालेजवळ गाडी पार्क करू शकता आणि वाटाड्याहि (किल्ल्या दाखवण्याचे ३०० रुपये घेतात ) मिळू शकतो.
  •  सकवार गावात जेवणाची सोय नाही.
ट्रेक करा ! फीट रहा !!


Monday, 24 July 2017

माहुली

दिनांक : १५ जुलै २०१७



देखणा, आकर्षक, तितकाच कणखर, घनदाट अरण्याने वेढलेला,सभोवताली धाक असलेला, थोडक्यात शिवजन्माचा मान हुकलेला, सह्याद्रीच्या रांगांमधील एक महत्त्वाचा किल्ला. माहुली तसा एकटा नाही. त्याला साथ देतात पळसगड, भंडारगड आणि काही सुळके. त्यातील काही तर आजही अजिंक्य आहेत.

हम सात साथ है 
ट्रेकिंगसाठी बाहेरगावी जाऊन गड-किल्ले सर करता करता घरापासून काही मिनिटांवर असलेला माहुली खुणवत होता. मग मात्र  ठरवून “माहुलीगड” मोहीम आखण्यात आली. मावळ्यांची जमवा जमव सुरु झाली आणि एकूण १० मावळे मोहिमे साठी तयार झाले. त्यातील ८ रात्री गडावर दाबा धरून बसणार होते आणि २ पाहाटे गडाकडे कूच करणार होते. दत्ता (माझा वर्गमित्र आणि खरा भटक्या ) आणि बंधू हे मोहिमीच नेतृत्व करणार होते. ह्या दोघानाही महुलीगडाचा अनुभव आहे, बंधूने तर हनुमान दरवाजा आणि कठीण असा कल्याण दरवाजाच्या बाजूने गड सर केला आहे. त्यामुळे बिनधास्त होतो. परंतु मित्र आणि अनुभवी ट्रेकर्सचे मेसेज येवू लागले, सर्वांच म्हणणे एकच कि पावसाळ्यात माहुली खूप रिस्की.. आणि खरंही आहे कारण निसर्गापुढे चुकीला माफी नाही. मनात हूर हूर होती पण ठरवलं कि आता काहीही होवो ट्रेक पूर्ण करायचाच.

महादरवाज जवळील देवड्या 

जुलै महिन्यातील दुसरा शनिवार आणि रविवार निश्चित करण्यात आला. डिकेथल्यॉनच्या वाऱ्या सुरु झाल्या. आवश्यक सामानाची जमवा जमाव सुरु झाली. बघता बघता शनिवार उजाडला सामानाची बांधा बांध झाली अक्षयराज असा आजारी पडला कि त्याला बोलताही येत नव्हत. त्याला घरीच सोडून आम्ही सातजन बाईकने दुपारी २:०० वाजता माहुली गडाकडे निघालो आणि ३:०० वाजता माहुली चढायला सुरुवातही केली. अविनाश,अक्षयराज आणि रोहित दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गडावर भेटणार होते.


जवळपास सर्वांचचं डीसेन्डिंग सुरु असताना आमच मात्र असेंडिंग सुरु झाल. संध्याकाळी ६:३० वाजता आम्ही महादरवाज्याच्या जवळ पोहोचलो. दरवाज्याला लागून देवड्या आहेत, हे माहुली गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. देवड्या ओल्या होत्या पण स्वच्छ होत्या. खांद्यावरून स्याक उतरवली आणि एकदम हलक वाटलं. जागा बघून टेंट लावले. एव्हाना दत्ता ने बनवलेला स्टोव्ह चांगलाच पेटला होता आणि त्याची उब जाणवू लागली होती. डब्बे उघडले गेले पोटपूजा करता करता आत गप्पांना आणि बाहेर पावसाला उत आला होता. जेवणानंतर बंधूने बनवलेल्या गरम गरम ब्ल्याक टीने तर अजूनच फ्रेश झालो. संपूर्ण गडावर आम्ही ७ मित्र आणि सोबतीला झोडपणार पाऊस,रोन्गावणारा वारा आणि गर्द अंधार. मधेच टोर्चच्या प्रकाशात चमकणाऱ्या देवड्या सगळ अगदी कस एखाद्या भयपटाला सजेस. रात्री १:३० ला अजून चार ट्रेकर्स देवड्या जवळ आले. बिचारे रस्ता चुकले होते आणि दोन तासंपासून गडावर फिरत होते. बाजूच्या देवडी मध्ये त्यांची सोय करून दिली. वाटा माहित नसतील आणि गावातील माहितीगार न घेता रात्री गड चढायला सुरुवात केली कि अजून काय होणार.
bhaडारगड प्लेटू 

रविवारी सकाळीच उठलो, आज तिन्ही गड फिरायचे होते. बंधू ने मस्त म्यागी बनवली होती. म्यागी आणि चहा पिवून आम्ही पुन्हा स्याक खांद्यावर मारली. भंडारगडावर रोहित, अक्षयराज आणि बाळा येवून भेटले. दत्ता आणि बंधूने सर्व गड व्यवस्थित दाखवला, खर तर धुक्यामुळे काही बघता आल नाही. परतीच्या प्रवासात तर गडावर हौशी ट्रेकर्सची जत्रा भरली होती. मोठ्या आवाजातली गाणी, एकांत मिळावा म्हणून आलेली जोडपी, मद्यपी. महाराज असते तर ह्या सर्वांचा कडेलोट निचित होता. मित्रानो खूप सुंदर गड आहे पण जर व्यवस्थित फिरायचा असेल तर शनिवार आणि रविवार सोडून कधीहि या.









 गडावर दिसणारी काही मानचिन्हे...

ट्रेक करा ! फीट रहा !!