Monday, 31 July 2017

अचानक टकमक


ढगांमध्ये लपलेला "टकमक"

दिपक, रुपेश आणि मी , फोटो काढणारा अर्थात अविनाश 
ठरल्या प्रमाणे दिपकचा फोन सुरु झाला, पुन्हा एक रविवार येणार होता. कामाच्या गडबडीत काही सुचत नव्हत आणि अगदी वेळेवर जवळचाच “टकमक किल्ला” करायचं ठरलं. वेळेवर सर्व ठरल्यामुळे जास्त मित्रांना सांगू शकलो नाही. रविवारी सकाळी ६:३० ला आम्ही बाईक ने सकवार ह्या किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाकडे निघालो. सकवार ते वज्रेश्वरी हे २६ किमीचं अंतर आहे . शिरसाड फाट्यापासून सुरत कडे जाताना साधारण ११ किमी वर उजव्या बाजूला सकवार हे गाव आहे. गावात गौशालेजवळ बाईक पार्क करून आम्ही किल्याच्या दिशेने निघालो. सोबत वाटाड्या होताच. मित्रानो, किल्ला आणि त्याचा परिसर यांची जर निट माहिती नसेल तर जाणकार वाटाड्या सोबत घ्यायला विसरू नका.

विश्रांतीचा एक क्षण 
पुन्हा पायपीट 
माझी ट्रेकमेट 
 गावापासून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वीस मिनिटांची पायपीट करावी लागते आणि मग चढाई सुरु होते. किल्ला मध्यम श्रेणीमध्ये मोडतो आणि उंची अंदाजे २००० फुट आहे. १२व्या शतकात बांधलेल्या ह्या किल्ल्याचा वापर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्या नंतर १६व्या शतकात हा किल्ला पोर्तुगीझांकडे गेला. त्याकाळी सुस्थितीत आणि राबता असलेल्या ह्या किल्ल्यावर आजमितीला पाण्याची टाक, दोन तोफा एक शिव मंदिर आणि तटबंदी ह्या व्यतिरिक्त काही नाही.  परंतु जर संशोधन केले गेले तर खूप काही मिळू शकेल.
रुपेश, दिपक आणि अविनाश 

सेल्फी वाला मोमेंट 
किल्ल्याकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलामधून जातो. काही ठिकाणी खडी चढाई आहे. घनदाट जंगल, सतत पडणारा पाऊस आणि धुक यामुळे वातावरणात कमालीची शांतता जाणवत होती. किल्ला तर ढगांमध्ये हरवला होता. एक तासाच्या पायपिटीनंतर आम्ही माचीवर पोहोचलो आणि अचानक सर्व वातावरण निवळल. समोर तानसा आणि वैतरणा ह्या नद्यांची विस्तीर्ण पात्र दिसत होती. बाजूला टकमकचा सुळका आणि मागे घनदाट जंगलामधून डोकावणारी पर्वतरांग. थोडीशी विश्रांती आणि पोटपूजा झाली. पुन्हा पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरु झाला आणि एका क्षणात किल्ला अदृश्य झाला.

सुपरमॅन रुपेश 
किल्ल्यावर पोहोचेपर्यंत जोरदार पाउस सुरु झाला होता त्यामुळे विशेष काही बघता आल नाही. थोडा वेळ किल्ल्यावर घालवल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. जवळचाच, अतिशय सुंदर आणि जैव-विविधतेने समृद्ध असा एक किल्ला आज पदक्रांत झाला होता. आळसावलेल्या रविवार मन प्रसन्न करून गेला.



पिण्याच्या पाण्याची टाकं 

तोफा

तटबंदी - फक्त हीच सुस्थितीत आहे.


कसे पोहोचाल ?
  • विरार (पूर्वे) पासून मुंबई-अहमदाबाद हायवे वर शिरसाड फाट्यापासून सुरत कडे जाताना साधारण ११ किमी वर उजव्या बाजूला सकवार हे गाव आहे.
  • सकवार गावात गौशालेजवळ गाडी पार्क करू शकता आणि वाटाड्याहि (किल्ल्या दाखवण्याचे ३०० रुपये घेतात ) मिळू शकतो.
  •  सकवार गावात जेवणाची सोय नाही.
ट्रेक करा ! फीट रहा !!


5 comments:

  1. अरे मिसळ राहिला ना भाउ .... पण मस्त हा राव

    ReplyDelete
  2. हा हा हा .. ती मिसळ पुन्हा खावीशी वाटते....

    ReplyDelete
  3. अक्षय पुढच्या वेळेस नक्की...

    ReplyDelete