Saturday, 6 October 2018

"हरिहर गड"


दि. २९ / ३०  सप्टेंबर २०१८

हरिहर किल्ला

संपूर्ण पावसाळा आराम केल्या नंतर ट्रेक करायची इच्छा जागृत झाली. बंधूच आणि माझं बेसिक बोलण झालं आणि “हरिहर गड” सर करण्याच ठरलं. अनपेक्षितपणे आमच्या एक शिलेदाराने मोहिमेतुन माघार घेतली, सध्या तो अध्यात्माच्या मागे आहे त्यामुळे त्याचा नकार गृहीत होता. आम्ही दोघांनी तयारी सुरु केली, मुक्काम गडावर करायचं ठरलं आणि त्या दृष्टीने बॅग भरायला सुरुवात केली. वास्तविक या आधीही हरिहर गड २ /३ वेळा जावून आलो होतो, परंतु सह्याद्रीच्या कोणत्याही किल्लावर किंवा कड्यावर तुम्ही जा प्रत्येक वेळी, प्रत्येक रुतुत त्याच नव रांगड़ रूप समोर येत त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत फिरताना कंटाळा कधीच जाणवत नहीं.

हरिहर गडाच्या कातळ कोरीव पायऱ्या
सह्याद्रीच्या प्रत्येक किल्ल्याची एक वेगळी ओळख आहे, रायगड म्हणजे टकमक टोक, हरिश्चंद्रगड म्हणजे कोकणकडा,राजगाडाची भव्यता, प्रतापगडाचा अफजल बुरुज, जंजीरा म्हणजे अभेदय तटबंदी तसच “हरिहर गड” म्हणजे सुंदर कातळ कोरीव पायऱ्या. त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या म्हणजे वास्तुस्थापत्याचा उत्तम आणि सुंदर नमूना. हरिहर गडाला भेट देणारा प्रत्येक भटक्या येथे काही क्षण रेंगाळतोच.

संध्याकाळी ५ वाजता आम्ही हर्षवाडीला पोहोचलो, गावाच्या शेवटी माजी सरपंच श्री. नारायण पारधी यांनी नुकताच सुरु केलेल्या धाब्यावर आम्ही थोडा वेळ विसावा घेतला, बाइक तिथेच पार्क करून गडाकड़े प्रस्थान केल. संध्याकाळी ६:३० वाजता मी आणि बंधू कोरीव पायऱ्यापर्यंत पोहोचलो. मावाळतीचा सूर्य घाई करू लागला होता.  सर्वात शेवटी गडउतार होणारे दोघे आश्चर्याने आमच्या कड़े बघत होतो, आम्ही वर राहणार आहोत याच त्यांना अप्रूप वाटत होत. माथ्यावर पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. तलावावरच्या काठावर हनुमानाच्या मंदिरा समोर समतोल जागा बघून टेंट लावला, सामानाची मांडणी केली. फ्रेश झालो आणि मस्त गरमागरम वाफाललेला चहा पित गप्पा मारत बसलो. गडावरची नीरव शांतत, चंद्राचा शीतल प्रकाश, रोंगावणारा वारा सार काही मनात साठवत कधी झोपलो हे कळलंच नाही.

पहाटे जाग आली, उगवतीला नारंगी छटा पसरल्या होत्या, थोड्याच वेळात सूर्य नारायणाने पदार्पण केलं आणि आसमंत विविध रंगात रंगून गेलं.. रमणीय आणि स्वर्गीय अनुभूति काय असते ते आता कळालं. सर्व गड फिरून झाल्यानंतर सामानाची बांधनी केली आणि परतीचा मार्ग पकडला. रविवार असल्यामुळे हौसे ट्रेकर्स एव्हाना सुरु झाले होते. गर्दी होवून वर अडकून पडण्याआधी दगडी जीना खाली उतरलो. खाली  आमच्या सारखेच केरळहून आलेले दोन वेडे भेटले, होंडा डीओ बाईक ने केरळ ते लेह प्रवासाला निघालेले. दोघांनी या प्रवासासाठी आपला जॉब सोडलाय. सलमानची “किक” कदाचित त्यानाही बसली असेल.त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देवून  मार्गस्थ झालो 
 
बंधूची ध्यान मुद्रा 

रंगांची उधळण 
प्रसन्न सकाळ 


गडाचा इतिहास ...



शंकराचे मंदिर व पुष्करणी तीर्थ
हरिहरगड ‘हर्षगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकजवळ ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला.

शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकारयाने जिंकून घेतला. त्यावेळी इंग्रज गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करीत जेणेकरून त्यांचा पुनर्वापर होवू नये परंतु ह्या गडाच्या पायऱ्या बघून कॅप्टन ब्रिग्ज आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्यामुळे गड जिंकूनसुद्धा कॅप्टन ब्रिग्जने ह्या सुंदर पायऱ्यांना उध्वस्त होवू दिले नाही.

व्यापारानिमित्त महाराष्ट्रातील अनेक बंदरात उतरणारा माल घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर गड आणि भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती. त्रिकोणी आकाराचा हरिहर गड समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे ...

हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील इतर अवशेष अशा साऱ्याच गोष्टी वैशिष्ट्य पूर्ण आहेत.

पायऱ्या संपल्यावर लागणारा पहिला छोटा दरवाजा आणि बुरुज 

दगडी बोगदा 

दुसरा दरवाजा 
हर्षवाडी गावातून जाणारा रस्ता हा सर्वात जवळाचा आणि कमी चढ़ाई असलेला आहे. तासभर चढ़ाई केल्यानंतर एका माचिवर आपण पोहोचतो येथे शंकराचे मंदिर व पुष्करणी तीर्थ आहे. इथलं पाणी पिण्यायोग्य आहे. तीच वाट पकडून पुढे साधारण अर्धा तासात आपण पुन्हा एका माची वर पोहोचतो. या ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले देव आपणास दिसतात. अनामिक देवतांची मांदियाळी येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. त्यानंतर आपण हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांसमोर पोचतो. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत असलेला दगडी जिना मान वर करून बघावा लागतो. पहिल्या भेटीतल प्रेम काय असत हे हा सुंदर जीना बघून तुम्ही अनुभवाल. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत, त्यांचा आधार घेत चढ़ाई सोपी होते. सुमारे नव्‍वद पायऱ्या चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटे प्रवेशद्वार लागते. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंस असणारे दोन लहान बुरुज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.  प्रवेशद्वाराच्‍या शेजारी उजव्या बाजुला गणेशाची छोटी मूर्ती आहे. प्रवेशद्वारापासून  पुढे, दगडात खोदलेला रस्ता आहे. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. इथेही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी दगडी बोगदा आहे.

गडावरील मारुती मंदिर 

हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस कैदखाना दृष्‍टीस पडतो पण तेथे जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झाल्याने दोराची आवश्‍यकता भासते. माथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी शिवलिंग आणि नंदी आहेत.





दारूचे कोठार,आणि त्यामागे दिसणारा सुळका 
गडाच्या एक टोकाला घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी दारुगोळा कोठाराची छोटी इमारत आहे. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई.  त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात.




साधारण १२ पाण्याच्या टाक्या गडावर आहेत. त्यातील काही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.  गडावर पाहण्यासारखं फारस तसं काही नाही. माथा निमुळता असल्याने २ तासात गड फिरून होतो.
हरिहर गडावरुन पूर्वेकडे दिसणारा त्र्यंबकगड, उत्तरेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे अप्पर वैतरणा तलावाच्या मागे  असलेला कावनाई व त्रिंगलवाडी किल्ला, समोर दिसणारा भास्करगड बघताना मन हरवून जाते.

कसे पोहोचल ...

हरिहरगडावर प्रामुख्याने दोन मार्गने जावू शकतो,  एक निरगुडपाडा ह्या गावातून आणि दूसरा हर्षवाडी ह्या गावातून.

पहिला मार्ग : निरगुडपाडा हे गाव त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर-खोडाळा रस्त्यावर त्र्यंबकेश्वरपासून, वीस किलोमीटरवर निरगुडपाडा गाव लागते. हे गाव हरिहरगड व भास्करगड या दोन्ही गडांच्या पायथ्याशी आहे.

दूसरा मार्ग : त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर त्र्यंबकेश्वरपासून, साधारण ५ किलोमीटरवर सापगाव फाटयापासून ९ किलोमीटर आत  हर्षवाडी हे  गाव लागते. हर्ष वाडीतून हरिहर किल्ल्यावर पोचण्यास एक तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

हर्षवाडीमधून किल्ल्यावर जाताना सर्वात शेवटी नारायण पारधी यांचा ढाबा लागतो, आगावू सूचना दिली तर तुम्हाला चहा, नाश्ता, शाकाहारी किवा मांसाहारी चुलिवरच रुचकर जेवण मिळू शकेल.


7 comments:

  1. सॉलिड खुप छान लेख आणि पिक्स

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा...

      Delete
  2. उन्हाळ्यापेक्षा पावसातील हरीहर अप्रतिम���� रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला...��
    तसाच उत्तम ब्लॉग����

    ReplyDelete
  3. राकेश भारी एकदम! भटकंती सोबत छान छायाचित्रे आणि लेखन! आता थांबू नको!👍

    ReplyDelete
    Replies
    1. दादा, तुझे ब्लॉग बघून शिकतोय...

      Delete